विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:49+5:302021-01-10T04:31:49+5:30
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेकडून शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोविड-१९च्या ...
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेकडून शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे शासनाने पदभरती बंद केली आहे. यातून शिक्षण सेवक पदभरती प्रकिया वगळण्यात आली, या निर्णयाचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाकडून स्वागत करण्यात आले. राज्यात शिक्षणसेवक भरती पवित्र प्रणालीमार्फत सुरू करण्यात आली होती. या भरतीमध्ये उर्दू माध्यम शिक्षक पदभरती करिता ९६६ एवढ्या तुटपुंज्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, पहिल्या टप्प्यामध्ये फक्त २६९ पदे भरण्यात आली असून, ६९७ जागा रिक्त राहिल्या. या जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करूनही दुसऱ्या टप्प्यात फक्त १७७ पदे भरून ५२० च्या जवळपास जागा रिक्त ठेवून उर्दू माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे उर्दू माध्यमासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक पदभरतीसाठी दुसरा टप्पा सुरू करण्यास परवानगी देऊन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची दिनांक तत्काळ जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या वेळी रमीज खान, वकार मोहसीन, मो. अजहर आदी उपस्थित होते.