लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:37+5:302021-04-24T04:41:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ही लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण अत्यल्प असून, लसीकरणामुळे संबंधित रुग्णांनी कोरोनावर सहज मात केली. लस घेतलेल्या जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त होता. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा आलेख खाली आला होता. गत दोन महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना संसर्गापासून बचाव तसेच कोरोनावर यशस्वी व सहजरित्या मात करण्यासाठी लस हा प्रभावी उपाय असून, प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लस घेतल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काहीजणांना कोरोना संसर्ग झाला; परंतु, सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी कोरोनावर सहज मात केली. लस घेतल्यामुळे संबंधित रुग्णाला मृत्यूचा धोका संभवला नाही. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००००००
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात ६ टक्के कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि आता ४५ वर्षांवरील सरसकट नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख ३० हजार जणांनी लस घेतली असून, यापैकी जवळपास सहा टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
लस घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने तीव्र स्वरुपाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यामुळे कोरोनावर सहज मात करता आली.
०००
लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमीच
कोरोना महामारीच्या या काळात लस महत्त्वाची असून, यामुळे मृत्यूचा धोका अतिशय कमी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस आवश्य घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
००००
०००००
कोट बॉक्स
कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय असून, आतापर्यंत १.३० लाख जणांनी लस घेतली आहे. कोरोना आणि गंभीर लक्षणांपासून बचाव म्हणून प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घ्यावी.
- डॉ. मधुकर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
००० ०००
दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ तीन टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत १.३० लाख जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यापैकी १२ हजार जणांना दुसरा डोस मिळाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास तीन टक्के जणांना कोरोना संसर्ग झाला; परंतु मध्यम व सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
०००० ००
आतापर्यंत किती जणांना दिली लस १,३०,७८०
केवळ पहिला डोस किती जणांनी घेतला १,१८,७७९
दोन्ही डोस किती जणांनी घेतले १२,००१