वाशिम जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; तरीही कृत्रिम टंचाईचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:29 AM2021-05-27T11:29:54+5:302021-05-27T11:29:59+5:30
Fertilizers in Washim distric : कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्नही विक्रेत्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार ३९ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे काही विशिष्ट खतांची कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्नही विक्रेत्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके सक्रिय झाली असून, जादा दराने खतविक्री झाल्यास विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून, खते, बियाण्यांची खरेदी करण्याकडे शेतकरी वळत आहेत. यंदा विशेषत: डीएपी खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. खताच्या किमती कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून झाल्यानंतर अनुदानात वाढ करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता डीएपी खत हे १,२०० रुपयांत उपलब्ध झाले आहे. विविध कंपन्या व ग्रेडनिहाय खतांच्या किमती जाहीर झाल्या असून, या दरानेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावे, याकरिता कृषी विभाग सज्ज झाला आहे. खतांच्या किमती व विक्री यासंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून सात भरारी पथकांनी जिल्हाभर दौरे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाने भरारी पथकातील सदस्यांचे संपर्क क्रमांक तसेच दरपत्रक कृषी सेवा केंद्रात दर्शनी भागात लावण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ३९ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनीही कंपनीनिहाय व ग्रेडनिहाय जाहीर केलेल्या दराप्रमाणेच रासायनिक खताची खरेदी करावी तसेच रासायनिक खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, अन्य खतांच्या तुलनेत आता डीएपी खताचे दर कमी झाल्याने या खताला मागणी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या १,५०० मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे. मात्र, वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे डीएपी खताची कृत्रिम टंचाई भासवली जात असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. (प्रतिनिधी)
खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कृषीनिविष्ठासंदर्भातील अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२३३४०००) संपर्क साधावा. खत, बियाण्यांसंदर्भात काही अडचण असल्यास नजीकच्या कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी किंवा संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधवा.
- व्ही.एस. बंडगर,
कृषि विकास अधिकारी
कंपनीने जाहीर केलल्या ग्रेडनिहाय खताच्या किमतीपेक्षा जादा दराने कोणत्याही कृषि सेवा केंद्र संचालकाने विक्री करु नये अन्यथा त्यांचा खत परवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द केला जाईल. शेतक-यांनी किमतीविषयी अथवा खताविषयी शंका, अडचन असल्यास तात्काळ कृषि विभागाकडे संपर्क साधावा.
- शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी