मानोरा येथे एकाच दिवशी आठ ठिकाणी चोरी
By admin | Published: June 5, 2017 02:21 AM2017-06-05T02:21:47+5:302017-06-05T02:21:47+5:30
नागरिक भयभीत; सुट्यांमुळे घराला कुलूप असल्याचा घेतला फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : लग्न व उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने परगावी गेलेल्या शिक्षकांच्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. एक-दोन नव्हे; तर तब्बल ८ घरांमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. ही घटना रविवार, ४ जूनला पहाटे चार वाजता उघडकीस आली.
रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मानोरा शहरातील संभाजीनगर व राहुल पार्क येथे घरफोडीची मोहीम राबवली. तब्बल आठ घरांचे कुलूप फोडून आत प्रवेश केला व साहित्याची नासधूस केली. संभाजीनगर येथील फिर्यादी प्रवीण सुरेश मुळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून १३ हजार रुपये लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, सीमा सुरज गायकवाड, बालाजी पुलाटे, विवेक केराम, पांडुरंग फावडे, बालाजी वाघमारे, भोयर व जोशी हे कुटूंब परगावी गेलेले असल्यामुळे त्यांच्या घरातून किती रुपयांचा माल लंपास झाला, याची माहिती मिळू शकली नाही. सदर घरफोडीच्या घटनेने मानोरा शहर पुरते हादरले असून, सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मानोरा येथे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घरफोडी झाल्याने मानोरा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ३८0 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार सुभाष महाजन करीत आहेत.