‘स्टाॅप डायरीया’-‘झेडपी’चे अभियान! जनजागृतीवर भर, आरोग्य जपण्याचा सल्ला
By संतोष वानखडे | Published: July 1, 2024 08:23 PM2024-07-01T20:23:37+5:302024-07-01T20:28:04+5:30
१ जुलैपासून या अभियानाचा शुभारंभ केला
संतोष वानखडे, वाशिम: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ‘स्टॉप डायरीया’ अभियान हाती घेतले असून, १ जुलैपासून या अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनोखे उपक्रम, अभियान राबविले जात आहे. पावसाळ्यात सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘स्टॉप डायरीया’ अभियानाचा शुभारंभ सोमवारी सीईओ वैभव वाघमारे यांनी ऑनलाईन पद्धतीने केला.
जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची उपस्थित होती. पुढील दोन महिने या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले. तालुक्यातील सर्व गट विकास अधिकारी, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.