वाशिम जिल्ह्यात आधार नोंदणी बंद, नागरिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:44 PM2018-07-27T13:44:12+5:302018-07-27T13:45:44+5:30
वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे १७ जुलैपासून वाशिमजिल्ह्यात आधार नोंदणी बंद असल्याने विविध कामांसाठी आधार नोंदणी करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. ठिकठिकाणच्या आधार कें द्रांवर नागरिक चौकशी करून निराशेने परत जात आहेत.
महा आॅनलाईन कंपनीकडून कर्जमाफीच्या अर्जांचे कमीशन, मराठा आरक्षणाच्या फॉर्मचे कमीशन, राजीव गांधी जीवनदायी कार्ड वाटपाचे कमीशन आणि मागील सत्रात आधार कार्डसाठी करार करण्यात आला होता. त्यासाठी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र चालकांनी आधार नोंदणीचे काम करण्यास नकार दिला होता. यावेळी ५० हजार रुपये अनामतीची अट शिथील केल्यानंतर सर्वत्र पुन्हा आधार नोंदणी सुरू झाली; परंतु आता पुन्हा आधार नोंदणीसाठी केंद्र चालकांना ही अट ठेवण्यात आली आहे. त्यातच ७/१२ बंद केल्याने केंद्र चालकांच्या रोजंदारीत मोठी घट झाली आहे. आता ५० हजार रुपये अनामत न भरल्यास आधार मशीन बंद करून कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधीत यंत्रणेकडून सांगण्यात आले. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रधारकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून ५० हजार रुपये अनामतीची जाचक अट रद्द करण्याची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही दिला;परंतु त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १७ जुलै रोजीच जिल्ह्यातील ५४ आधार केंद्रधारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्या. त्यामुळे जिल्हाभरात आधार नोंदणी बंद झाली असून, आधार कार्ड नसलेले विद्यार्थी, निराधार लाभार्थींसह इतर नागगरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.
पॅनकार्डधारक, विद्यार्थ्यांची गोची
सध्या सर्वत्र शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. शिष्यवृत्ती ही बँकखात्यावर जमा होते आणि बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही. त्यामुळे त्यांना आधार नोंदणी करून मुदतीच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे; परंतु आधार नोंदणीच बंद असल्याने या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून, निर्धारित मुदतीत केवळ आधारअभावी अर्ज सादर करणे शक्य झाले नाही, तर त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याशिवाय पॅनकार्डवरील जन्मतारखेसाठी आधार आवश्यक असून, विविध कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने अनेक व्यक्ती यासाठी आधार केंद्रावर येत असले तरी, नोंदणीच बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.