मोप येथे रास्ता रोको; हराळ येथे ठिय्या!
By admin | Published: June 3, 2017 01:59 AM2017-06-03T01:59:20+5:302017-06-03T01:59:20+5:30
राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग : रिसोड येथे आज शेतकऱ्यांचा मोर्चा, ६ जून रोजी जिल्हा बंदचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील एकूण पाच गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले. मोप येथे रास्ता रोको तर हराळ येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, ३ जून रोजी रिसोड येथे मोर्चा असून, ६ जून रोजी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. मोप येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मोप : राज्यव्यापी संपात सहभागी होत रिसोड तालुक्यातील मोप येथील शेतकऱ्यांनी रिसोड ते लोणार मार्गावरील मोप फाट्याजवळ सकाळी ९ वाजताच्या सुमारास रास्ता रोको केला. यामुळे दोन्ही बाजूने दोन किलो मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच रस्त्यावर दूध सांडवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. या संपात सहभागी शेतकऱ्यांशी आमदार अमित झनक यांनी मोबाइलद्वारे संपर्क साधून संपकरी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. मोप येथील शेतकऱ्यांनी सकाळी मोप फाट्यावर रास्ता रोको केला. संपादरम्यान यापुढे कोणताही शेतमाल शहराकडे जाऊ न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. गावातल्या गावातच वस्तुविनिमय करण्याचे ठरविण्यात आले. परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्र बंद ठेवून या संपात सहभाग नोदंविला, तसेच दूध रस्त्यावर सांंडवून दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
हराळचा बाजार कडकडीत बंद
हराळ : हराळ येथील युवा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपात सहभाग घेऊन ५०० ते ७०० लिटर दूध हे गावातच ठेवण्याचे ठरविले. शेतात पिकणारा भाजीपालासुद्धा शहरात विक्रीकरिता न नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार नाही, तोपर्यंत हा संप मागे न घेण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश बिल्लारी, तानाजी बिल्लारी, प्रमोद बिल्लारी, रामप्रभू सरकटे, गणेश वाघमारे, ग्रामपंचायत सरपंच अमोल जोगी, संतोष बिल्लारी, गजानन बिल्लारी, महिला व बालविकास प्रकल्प प्रमुख भानुदास सरकटे, किसनतात्या सरकटे, विलास महाराज, संभाजी खाडे, रमेश पडघान, मदन बिल्लारी, मंगेश सरकटे, उमेश खाडे, गजानन महाकाळ, बबलु सरकटे, किशोर सरकटे, सोनु बिल्लारी, पिंटू सरकटे, गणेश खरात, भागवत बिल्लारी, माधव सरकटे, बाबुराव सरकटे, हनुमान सरकटे यांच्यासह शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. हराळ गावातून भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
टणका येथे बेमुदत संप
वाशिम : १ जूनपासून टणका, सोनगव्हाण व झोडगा येथील शेतकरी बेमुदत संपावर गेले आहेत. दुसऱ्या दिवशीही शेतकरी बेमुदत संपावर होते. कुठल्याच प्रकारचा शेतमाल बाजारपेठत पाठविण्यात आला नाही, तसेच शेकडो लिटर दूधदेखील गावातच ठेवण्यात आले.
रिसोड येथे आज मोर्चा
रिसोड : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनास समर्थन म्हणून अॅड. नकुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात शेतकरी व नुकल देशमुख मित्र मंडळाच्यावतीने ३ जून रोजी लोणी फाटा ते तहसील कार्यालयावर असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, रिसोड बाजारपेठ, दूध दुकाने बंद राहणार आहेत. सदर मोर्चात तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मजूर युवक सहभाग नोंदविणार आहेत.
६ जूनला जिल्हा बंदचे आवाहन
वाशिम : शेतकऱ्यांच्या न्यायोचित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतकरी संपाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ६ जून रोजी वाशिम जिल्हा बंदची हाक शेतकरी व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी दिली आहे. ६ जून या तारखेला रयतेचा व शेतकऱ्यांचा खरा कैवारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणीची खरी जाण असलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्यावतीने ६ जूनला जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांशी निगडित कृषी विभाग असल्याने शेतकऱ्यांच्या संपाला समर्थन म्हणून ६ जूनला जिल्हा बंदची हाक देण्यात आली, अशी माहिती कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी दिली.