वाशिम जिल्ह्यात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:10 IST2018-02-13T15:08:42+5:302018-02-13T15:10:49+5:30
नियमबाह्य पद्धतीने होणाºया बोगस व्यवहारांवर बहुतांशी अंकुश बसला असून जमिन अथवा भुखंड खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

वाशिम जिल्ह्यात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!
वाशिम : २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात चलनातून जुन्या ५०० आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर केंद्रशासनाने संपूर्ण देशात ‘जीएसटी’ लागू केली. यामुळे नियमबाह्य पद्धतीने होणाºया बोगस व्यवहारांवर बहुतांशी अंकुश बसला असून जमिन अथवा भुखंड खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. वाशिम जिल्हाही त्यास अपवाद राहिलेला नाही. जिल्ह्यात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार बहुतांशी ठप्प असून लाखमोलाच्या खाली भुखंडांनाही अपेक्षित दर मिळत नसल्याची माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली.
मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासह इतर कारणांमुळे ग्रामीण भागातून शहरी भागात वास्तव्याला येणाºयांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रारंभी भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करणारी ही मंडळी नंतरच्या काळात स्वत:चे घर उभारण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच वाशिम जिल्ह्यातील शहरी भाग झपाट्याने विकसीत झाला आहे. मात्र, नोटाबंदीनंतरच्या काळात महागडा भुखंड घेणे, त्यावर आलिशान घर उभारण्याची बाब कठीण झाली असून बँकेतून रोखीने मोठी रक्कम ‘विड्रॉल’ होत नाही आणि धनादेश अथवा ‘डिमांड ड्राप्ट’ने व्यवहार केल्यास त्यावर ‘जीएसटी’ लागून संपूर्ण व्यवहार अधिकृत होत असल्याने त्याचा थेट परिणाम जमिन अथवा भुखंड खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारावर झाला आहे. यामुळे जमिन अथवा भुखंड खरेदी-विक्रीच्या व्यवसायात कधीकाळी बिनदिक्कत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करणाºया बिल्डरांच्या एकप्रकारे मुसक्या आवळल्या गेल्याचे दिसून येत आहे.