बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:58+5:302021-07-07T04:50:58+5:30

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, आता एसटीही काहीशी मार्गावर आली आहे. एसटी प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक गाडीची लाइव्ह ...

Stop sitting at the bus stop; Every bus will know the 'live location'! | बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

Next

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, आता एसटीही काहीशी मार्गावर आली आहे. एसटी प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक गाडीची लाइव्ह वेळ कळावी यासाठी सर्व गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येत आहे. वाशिम आगारात ही सुविधा लवकरच साकारली जाणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एस.टी. महामंडळाच्या बसलाही फटका बसला. प्रवासी वाहतूक प्रभावित झाली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने १०० टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. अनेक वेळा बस उशिराने धावणे, निश्चित वेळापत्रक नसणे, लांब पल्ल्याच्या किंवा ग्रामीण भागातील बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्या तर आगारात पोहोचण्यास विलंब होणे आदी कारणांमुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी बसला ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येत आहे. वाशिम आगारातही सर्व बसला ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा बसस्थानकावर ताटकळत बसण्याचा वेळ वाचणार आहे.

०००००००००००००

गाडीची स्पीड, लोकेशनही कळणार

वाशिम आगारात सध्या २० बस सुरू आहेत. नाशिक, औरंगाबाद व नागपूर अशा तीन बस लांब पल्ल्याच्या, तर उर्वरित ग्रामीण भागात व नजीकच्या जिल्ह्यात धावतात.

सर्व बसला ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येत असल्याने याद्वारे गाडीचा वेग किती आहे, लोकेशन काय आहे, याची माहिती आगाराला मिळणार आहे.

या माहितीच्या आधारे आवश्यकता भासल्यास चालकाला काही सूचनाही करता येणार आहेत. ट्रॅकिंग सिस्टीममुळे बसची इत्यंभूत माहिती मिळणार आहे.

०००००००००

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

वाशिम बसस्थानकात मध्यवर्ती ठिकाणी मोठे स्क्रीन बसविण्यात आले आहेत.

या स्क्रीनवर प्रत्येक गाडी सध्या कुठल्या ठिकाणी आहे, स्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती मिळणार आहे.

याशिवाय बसचे कुठे ब्रेक डाऊन व अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांनाही वेळेवर व घटनास्थळी पोहोचण्यासाठी या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे. या सिस्टीमचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे वाशिम आगाराने स्पष्ट केले.

००००००००००००

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

यापूर्वी अनेक बसला वेळेवर धावत नसल्याने याचा मानसिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. बसला नेमका कशामुळे विलंब होत आहे, याची माहिती यापूर्वी मिळत नव्हती.

आता ट्रॅकिंग सिस्टीममुळे लाइव्ह लोकेशन कळणार असल्याने बसला विनाकारण विलंब होत असेल, वाहक-चालकाकडून कोठे टाइमपास केला जात असेल तर याची माहिती ताबडतोब कळणार आहे.

यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच गाड्यांना वेळ पाळणेही सोपे होईल. आपल्यावर कुणाचा तरी वॉच आहे, याची कल्पना असल्याने कर्मचारीदेखील वेळेचे बंधन पाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

०००००००००

कोट

वाशिम आगारातील सर्वच बसला ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या वाशिम आगाराच्या २० बस सुरू आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या तीन बसचा समावेश आहे. आगारात मोठा स्क्रीन बसविण्यात आला आहे. त्यामुळे बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. लवकरच ही सुविधा साकारली जाणार आहे.

- विनोद इलामे,

आगारप्रमुख, वाशिम

Web Title: Stop sitting at the bus stop; Every bus will know the 'live location'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.