महसूल कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:53 AM2017-10-11T01:53:05+5:302017-10-11T01:54:25+5:30
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळ सेवेने भरल्यास महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाचे कर्मचार्यावर अन्याय होणार असून, अनेक अव्वल कारकून संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सूचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाकडे यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती; मात्र या मागणीवर कोणताच विचार न झाल्याने ३ ऑक्टोबरपासून पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनावर गेले आहेत. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील कर्मचार्यांचादेखील सहभाग आहे. महसूल कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल कर्मचार्यांनी १0 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. महसूल कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सन २0१२ ते २0१५ या चार वर्षात राज्यात विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले होते. सन २0१३ व २0१४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री, तत्कालीन महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव व वित्त विभागाच्या अधिकार्यांशी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी चर्चा केली होती. प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेने केला. या आश्वासनाला तीन वर्षे झाले; मात्र अद्यापही कार्यवाही नसल्याने महसूल कर्मचार्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १0 ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, वाशिम जिल्हय़ातील महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयातील महसूलविषयक कामकाज ठप्प झाले.
तहसीलस्तरावर कामांचा खोळंबा
पुरवठा विभागासह तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. परिणामी, वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा येथील तहसील कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. कर्मचार्यांची लेखणी बंद असल्यानेकोणतेही कामकाज होऊ शकले नाही. याचा फटका ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य जनतेला बसला.
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी आहेत. सर्व मागण्या मंजूर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. राज्य शासन वेळोवेळी केवळ आश्वासन देऊन संपाची सांगता करते. प्रत्यक्षात आश्वासनाची पूर्तता अद्यापही केली नाही. आता लेखी स्वरूपात दिल्यानंतरच संप मागे घेतला जाईल.
- विशाल डुकरे
जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, वाशिम.