इंझोरीतील साठवण तळ्याचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:46 PM2020-08-10T15:46:35+5:302020-08-10T15:46:44+5:30
या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून इंझोरी येथे सन २०१८-१९ मध्ये साठवण तळे मंजूर झाले; परंतु हे साठवण तळे पूर्ण होऊ शकले नाही. आता या अर्धवट तळ्यात लाखो लिटरचा जलसाठा होत असल्याने भूजल पातळीला आधार झाला असला तरी, या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पाणलोटाची अनेक कामे करण्यात आली. त्यात नाला खोलीकरण, नदी खोलीकरण सलग समतल चर, नालाबांधासह जवळपास ४८ साठवण तळेही प्रस्तावित करण्यात आले होते. या कामांसाठी बीजेएसने आवश्यकतेनुसार जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या, तर शासनाकडून इंधनाचा खर्च देण्यात येत होता; परंतु साठवण तळ्यांचे खोदकाम शासनाच्या निर्धारित इंधन दरात पूर्ण होणे कठीण असल्याने अनेक ठिकाणचे तळे अर्धवटच राहिले. त्यात इंझोरी येथील तळ्याचाही समावेश होता. तब्बल शंभर चौरस मीटर आकार आणि तीन मीटर खोल अशा स्वरूपाच्या तळ्याचे काम कृषी विभागाने सुरू केले. चारही बाजूनी दोन मीटर रुंद आणि तीन मीटर खोल नाल्या खोदल्यानंतर मात्र इंधन दराची अडचण निर्माण झाल्याने हे तळे अर्धवटच राहिले. तथापि, त्याच वर्षी पावसाळ्यात या अर्धवट शेततळ्यात लाखो लिटरचा जलसाठा झाला. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीसह विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत सिंचनास आधार झाला. तथापि, या साठवण तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांत गुरे पडण्याच्या घटनाही घडू लागल्या. त्यामुळे पशूपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महामार्गाच्या माध्यमातून काम करण्याची मागणी
जिल्ह्यात समृद्धी महामार्गासह विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गौण खनिजाची पूर्तता करण्यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात शंभर चौरस मीटर आकाराचे साठवण तळेही झाले असून, त्याचा फायदा संबंधित गावातील शेतकºयांना होत आहेच शिवाय भूजल पातळी वाढून पाणीटंचाईचा प्रश्नही मिटला आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या कारंजा-मानोरा महामार्गाच्या माध्यमातून या साठवण तळ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी इंझोरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.