कारंजा शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:57+5:302021-08-12T04:46:57+5:30
कारंजा लाड : देशाच्या पटलावर ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कारंजा शहरात मागील काही दिवसांपासून वाहतूककोंडीची समस्या भेडसावत ...
कारंजा लाड : देशाच्या पटलावर ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कारंजा शहरात मागील काही दिवसांपासून वाहतूककोंडीची समस्या भेडसावत हेाती. यावर उपाय म्हणून १० ऑगस्ट रोजी वरिष्ठांच्या आदेशावरून कारंजा शहरातील मुख्य चौकांसह विविध रस्त्यांवर पालिका प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत ज्या दुकानदारांनी साहित्य रस्त्यावर ठेवले होते, शिवाय वारंवार सूचना देऊनही ज्या हातगाडी चालकांनी आपल्या हातगाड्या हलविल्या नाही, अशा हातगाड्यावरील साहित्य पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जप्त केले. शहरातील मुख्य रस्त्यासह गांधी चौक, जयस्तंभ चौक व बजरंगपेठ परिसरातील ही मोहीम राबविण्यात आली. कारंजा शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर दुकानासमोर उभी करण्यात येत असलेली वाहने आणि दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेले साहित्य, यामुळे रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले होते, शिवाय वेळोवेळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत होती. अखेर पालिका प्रशासन व पोलिसांच्या वतीने संयुक्तपणे अतिक्रमण हटाओ मोहीम राबविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतुकीस अडथळा हेात असलेल्या ठिकाणीही कारवाई केली.
मात्र, काही पोलीस अधिकारी यांनी दुकानदाराने विक्रीसाठी आणलेले साहित्य जबरदस्तीने, जप्ती केल्याने पोलिसांप्रती नाराजी व्यक्त होत आहे.