वाशिम शहरातील अरुंद रस्त्यांवर जडवाहनांचे अतिक्रमण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:23 PM2017-12-03T22:23:28+5:302017-12-03T22:36:48+5:30
वाशिम शहरातील अंतर्गत वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडाला असून, रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी करण्याची मागणी जोर धरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरातील दैनंदिन वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडत असून रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. तथापि, शहर वाहतूक विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवून गर्दीच्या वेळा लक्षात घेता, जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
वाशिम शहरात रविवार हा बाजारचा दिवस आहे. वास्तविक पाहता आठवडी बाजाराकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जागा देण्यात आलेली आहे. मात्र, बहुतांश भाजीविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून शहराचा आत्मा समजल्या जाणा-या पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावरच बाजार भरवितात. या रस्त्यावरील दुभाजकही भाजीविक्रेत्यांनी मोकळा सोडलेला नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. एवढी गंभीर स्थिती असताना जडवाहनांवरही कुठलेच निर्बंध नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ट्रक, ट्रॅक्टर अथवा यासारखेच एखादे मोठे वाहन गर्दीतून वाट काढत असताना तासन्तास छोटी वाहने अडकून राहतात. एकूणच या सर्व समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्याकरिता शहरांतर्गत रस्त्यांवर जडवाहनांना प्रवेश नाकारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.