पोटनिवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:09+5:302021-06-24T04:28:09+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटांत आणि सहा पंचायत समित्यांमधील २७ गणांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ...
वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटांत आणि सहा पंचायत समित्यांमधील २७ गणांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २९ जून रोजी निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. २९ जून ते ५ जुलै २०२१ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकारी स्वीकारतील. रविवार, ४ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व त्यावर निर्णय देण्याची कार्यवाही ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. जेथे अपील नाही, अशा ठिकाणी १२ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. जेथे अपील आहे, अशा ठिकाणी १४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची कार्यवाही करता येईल. १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल, तर मतमोजणी २० जुलै २०२१ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.