आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:24+5:302021-06-30T04:26:24+5:30

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटांत तसेच त्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांच्या २७ गणांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या ...

Strictly enforce the code of conduct | आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

Next

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटांत तसेच त्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांच्या २७ गणांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूक क्षेत्रांमध्ये २२ जूनपासूनच आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. संबंधित क्षेत्रात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २९ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, साहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित निवडणूक क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. तरीही काही अडचणी आल्यास त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावे. निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे तसेच निवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणासाठीसुद्धा विशेष प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या वेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली तसेच त्यांना आवश्यक मनुष्यबळ, वाहने, मतदान यंत्रे याविषयी माहिती जाणून घेतली.

०००००

स्ट्राँग रूमची तपासणी करण्याच्या सूचना

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व मतदान केंद्रांची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. ईव्हीएम ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचीसुद्धा तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी. निवडणूक प्रशिक्षण, मतदान साहित्य वाटप अथवा जमा करताना एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.

०००

५५९ मतदान केंद्रांवर होणार मतदान

निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, जिल्ह्यात ५५९ मतदान केंद्रांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांची तपासणी करून मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी तसेच मुसळधार पाऊस अथवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मतदान केंद्रांचा संपर्क तुटणार नाही, याची खात्री करावी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण एकाच वेळी न घेता गटा-गटाने घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Strictly enforce the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.