धक्कादायक ! लग्नास नकार दिल्यानं युवतीला जिवंत जाळलं; उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:44 PM2018-06-23T13:44:26+5:302018-06-23T14:29:28+5:30
लग्न करण्यास नकार दिल्याने एका १८ वर्षीय युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.
अनसिंग : लग्न करण्यास नकार दिल्याने एका १८ वर्षीय युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना १९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान, अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरु असताना पिडीत तरुणीचा मृत्यू झाला.
अनसिंग पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी येथील आरोपी रवी भगवान भालेराव (२१) याने गावातील १८ वर्षीय मुलीला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत, त्या मुलीच्या घरात प्रवेश केला. माझ्या आई-वडीलांच्या संमतीने मला लग्न करावयाचे आहे, असे म्हणून पिडीत मुलीने त्याला नकार दिला. हा राग मनात धरून आरोपीने अंगावर रॉकेल टाकून सदर मुलीला जाळले. पीडितेच्या जबाबावरुन अनसिंग पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवी कलम ४५२, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले. मुलीला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरु असताना पिडीत तरुणीचा मृत्यू झाला. सदर घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची चर्चा आहे. पुढील तपास अनसिंग ठाणेदार करीत आहेत. (वार्ताहर)
लग्नासाठी बळजबरी..!
गावातील रवी नामक युवक हा लग्नासाठी तिला नेहमी गळ घालत होत. लग्नाची जबरदस्त करत होता. परंतु आपण आपल्या आईवडीलांच्या मर्जीनुसार लग्न करणार आहे, ते म्हणतील त्या मुलासोबत लग्न करणार असल्याची ठाम भूमिका तिने त्या युवकाला सांगितली होती. पंरतु तो मात्र ऐकण्यास तयार नव्हता. १९ जुन रोजी घरी कोणी नसतांना या युवकाने तिच्या घरात प्रवेश केला आणि लग्न करण्याची जबरदस्ती करु लागला. तिने पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करताच, त्याने रागाच्या भरात सदर पीडित युवतीला जिवंत पेटवून दिले आणि तो फरार. घरच्यांनी तिला अनसिंग येथे रुग्णालयात नेले. तेथून तिला वाशिम व नंतर अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.