प्रवाशांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्न - गजानन मल्ल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:13 PM2019-09-15T13:13:37+5:302019-09-15T13:14:09+5:30
दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सर्वात आरामदायक, किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे पाहिले जाते. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करित असून वाशिममधील समस्या आणि तत्सम विषयासंबंधी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......
वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम केव्हा पूर्ण होणार?
- राज्यशासन आणि केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने सुरू असलेल्या वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू आहेत.
वाशिम रेल्वे स्थानकावर अद्याप सीसी बसलेले नाहीत, त्याविषयी काय ?
- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. वाशिम रेल्वे स्थानकासह परिसरात आवश्यक त्याठिकाणी सीसी कार्यान्वित करण्यासंबंधीचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. यासह वाशिम रेल्वेस्थानकातील स्वच्छतेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रश्न निकाली काढला जाईल.
वाशिम स्थानकावरून आणखी कुठल्या गाड्या सुरू होणार ?
- नागपूर-कोल्हापूर व्हाया वाशिम धावणारी तसेच अजनी-मुंबई या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसह सिकंदराबाद, जयपूर, नांदेड, बिकानेर, गंगानगर या सर्व एक्सप्रेस गाड्या दररोज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय नागपूर-औरंगाबाद डेली इंटरसिटी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. वाशिमवरून धावणाऱ्या गंगानगर-जयपूर-बिकानेर या एक्सप्रेस रेल्वेला शेगाव येथे थांबा देण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हे शक्य झाल्यास संतनगरी शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची सोय होणार आहे.
अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?
- अकोला ते खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू असून अकोला ते अकोट यादरम्यानचा मार्ग देखील तयार झाला आहे. त्याची पाहणी व चाचपणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सदर मार्गावर असलेल्या अकोट रेल्वे स्थानक तयार करण्याचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अकोला ते अकोटपर्यंतच्या रेल्वेमार्गाची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. अकोट ते खंडवा हा रेल्वेमार्ग ‘टायगर झोन’मुळे अडचणीत सापडला आहे. पर्यावरण विभागाची त्यास मंजूरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.