पर्यावरण संवर्धनासाठी माहुलीच्या युवकाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:50+5:302021-07-19T04:25:50+5:30

मानोरा: मानवाने स्वार्थापोटी केलेल्या वारेमाप वृक्षतोडीमुळे आजच्या घडीला पर्यावरणाचा ऱ्हासच झाला नाही, तर सृष्टीच संकटात सापडली आहे. जगभरातील ...

The struggle of Mahuli youth for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी माहुलीच्या युवकाची धडपड

पर्यावरण संवर्धनासाठी माहुलीच्या युवकाची धडपड

Next

मानोरा: मानवाने स्वार्थापोटी केलेल्या वारेमाप वृक्षतोडीमुळे आजच्या घडीला पर्यावरणाचा ऱ्हासच झाला नाही, तर सृष्टीच संकटात सापडली आहे. जगभरातील लाखो पर्यावरणप्रेमी या संदर्भात जनजागृती करण्यासह पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवित आहेत. त्यात मानोरा तालुक्यातील माहुली येथील पक्षीप्रेमी वृक्षप्रेमी निखील चव्हाण या युवकाचाही समावेश असून, हा युवक गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी धडपडत असून, वृक्षसंख्या वाढविण्यासाठी तो दरवर्षी हजारो सीड्स बॉलची निर्मिती करतो. यंदाही त्याने हा उपक्रम सुरू केला आहे.

गेल्या तीन, चार दशकांत वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. अगदी कल्पनेच्या पलीकडे जंगलतोड होत आहे. यामुळे वन्यप्राणी, पक्ष्यांचे अधिवासच संकटात आले नाही, तर आवश्यक खाद्याअभावी त्यांचे अस्तित्वच संकटात आल्याने अन्न साखळी खंडित होत आहे. ही समस्या गंभीर रूप धारण करू पाहत असताना जगभरातील पर्यावरण प्रेमी पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने धडपड करीत आहेत. त्यात मानोरा तालुक्यातील माहुली येथील निखिल चव्हाण हा युवक गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, पक्षी संवर्धनासाठी झटत आहे. पक्ष्यांना अन्नपाणी मिळावे म्हणून विशेष प्रकारचे पात्र तयार करून ते वितरित करण्याचे कार्य त्याने केले आहे. शिवाय दरवर्षी सीड्स बॉलची निर्मितीही तो करतो. यंदाही त्याने हा उपक्रम सुरू केला असून, तयार केलेले सीड्स बॉल रानावनात टाकून वृक्षसंख्या वाढविण्याचा प्रयत्न तो करीत आहे.

------------------

परिसरातील युवकांनाही प्रशिक्षण

माहुली येथील पर्यावरणप्रेमी निखिल चव्हाण स्वत: दरवर्षी सीड्स बॉल तयार करतोच शिवाय परिसरातील युवकांनाही या संदर्भात प्रशिक्षण देऊन पर्यावरण संवर्धनासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्यही करतो. शिवाय लहान मुलांच्या मनात वृक्षप्रेम निर्माण होण्यासाठी तो विविध ठिकाणी कार्यशाळाही घेतो. अधिक प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांबद्दल माहिती देण्यासह वृक्ष लागवड करण्याची पद्धत, संगोपनाबद्दलही तो मार्गदर्शन करतो. त्याच्या या कार्याची दखल घेत विविध संघटना, संस्थांकडून त्याला अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत.

Web Title: The struggle of Mahuli youth for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.