सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी करण्याची धडपड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:03 PM2020-08-21T12:03:34+5:302020-08-21T12:03:58+5:30
११० मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन धडपड करीत असून, त्यासाठी गावगावात गणेश मंडळांचे समुपदेशन करण्यात येत आहे. यात कारंजा आणि मंगरुळपीर उपविभागात मिळून आजवर ११० मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झाली.
कोरोना संसर्गाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्ह्यातील ११० गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर मंडळानी सुद्धा असा निर्णय घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासन करीत आहे.
गावागावांत सभा
पोलीस अधीक्षक वंसत परदेशी यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरीच उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तिन्ही उपविभागांतर्गत गावागावांत ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी, कर्मचारी सभांचे आयोजन करून मार्गदर्शन करीत आहेत.
उपविभागातील आसेगाव, जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनसइ इतर काही ठिकाणचे मिळून ६५ मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. - यशवंत केडगे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर
कारंजा उपविभागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी ५० मंडळांनी दर्शविली आहे. हा आदर्श इतरांनी घेण्यासाठी समुपदेशन केले जात आहे.
- संजय पाटील,
उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा