एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने; मात्र मास्क बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:11 AM2020-09-18T11:11:39+5:302020-09-18T11:15:20+5:30
प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
वाशिम : अनलॉक-४ अंतर्गत एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. ही प्रवासी वाहतूक करताना मात्र प्रत्येक प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी या संदर्भातील पत्र १७ सप्टेंबर रोजी सर्व विभाग नियंत्रकांना पाठविले आहे.
राज्यशासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) परवानगी दिली होती. त्यानुसार रा. प. विभागाकडून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्र्तीवर महाराष्ट्र राज्य एसटी मंडळाच्या बसेसद्वारेही पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, ही प्रवासी वाहतूक करताना बसमधील प्रत्येक प्रवाशास सॅनिटायझर लावणे, मास्क बांधणे आवश्यक राहणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसगाड्या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्याच्या सुचना एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व विभागीय नियंत्रकांना १७ सप्टेंबर रोजी दिल्या आहेत.