अनसिंग बसस्थानकासमोर साचले पाणी; ग्रामस्थांची गैरसोय
By admin | Published: July 1, 2016 01:11 AM2016-07-01T01:11:44+5:302016-07-01T01:11:44+5:30
समस्येबाबत ग्रामपंचायतीला निवेदन.
अनसिंग (जि. वाशिम): येथील बसस्थानकासमोर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात सदर खड्यांमध्ये पाणी साचत असून, याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ही समस्या तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. अनसिंग येथे नवीन बसस्थानक होऊन सुमारे सात वर्षांचा काळ उलटला. असे असताना बसस्थानक आवारात अद्याप कुठलेच ठोस काम झालेले नाही. तसेच एस.टी. बसस्थानक प्रवेशाच्या ठिकाणी तसेच बाहेर निघत असताना त्याचठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून बस चालवित असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सोबतच खड्ड्यांमुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, अडचणींमध्ये भर पडली आहे. तथापि, ही समस्या विनाविलंब निकाली काढावी, अशी मागणी येथे जोर धरत आहे.