दोन महिन्यात विद्यार्थी उपस्थिती ५५ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:50+5:302021-01-25T04:40:50+5:30
वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, २३ जानेवारी रोजी हे वर्ग ...
वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, २३ जानेवारी रोजी हे वर्ग सुरु झाल्यास दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थी उपस्थिती ५५ टक्क्यांवर पोहोचली असून, या दरम्यान विद्यार्थी किंवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यापैकी कुणालाही कोरोना विषाणू संसर्ग झालेला नाही.
गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, तेथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळांमध्ये २,५५१ शिक्षक आणि १,६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थी उपस्थिती ५५ टक्क्यांवर गेली असून, ४५ हजार १८३ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेत एका बेंचवर एक विद्यार्थी बसविण्यात येत असून, तपासणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहात असून, यामध्ये प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविण्यात येत आहेत. कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, ही बाब दिलासादायक ठरत आहे.
००००
जिल्ह्यातील कुणीही संक्रमित नाही
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘कोविड-१९’च्या नियमांचे पालन करून शिकवण्यात येत आहे. तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. तसेच कोरोना चाचणी झाल्यानंतरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलाविण्यात आले. दोन महिन्यांच्या कालावधीत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.
०००
गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांवर भर
नववी ते बारावीच्या वर्गात गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. शाळेत उपस्थित न राहिलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिकवण्यात येत आहे. काही विद्यार्थी व पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याने ते अद्याप शाळेत येऊ शकलेले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाविषयक भीती दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
००
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा आहेत. आतापर्यंत ३५६ शाळा सुरू झाल्या आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थी उपस्थिती वाढत असून, एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झालेला नाही. कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
०००
एकूण विद्यार्थी ८२,१५१
उपस्थित विद्यार्थी ४५,१८३
गैरहजर विद्यार्थी ३६,९६८
००
एकूण शाळा ३६३
शाळा उघडल्या ३५६
शाळा बंद ०९