ट्रॅक्टरखाली आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, संतप्त जमावाकडून ट्रॅक्टरची तोडफोड
By संतोष वानखडे | Published: October 9, 2023 07:20 PM2023-10-09T19:20:38+5:302023-10-09T19:21:21+5:30
कामरगाव येथील घटना
संतोष वानखडे, वाशिम : ट्रॅक्टर मागे घेत (रिव्हर्स) असताना, चाकाखाली आल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील काझी प्लॉटमध्ये ९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजतादरम्यान घडली. अतेमा फातेमा मुजाईद खान असे मृतक मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे कामरगाव काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अतेमा फातेमा मुजाईद खान ही इयत्ता पाचवीत शिकत होती. एक ट्रॅक्टर काझी प्लॉट येथील एका घराजवळ विटा टाकण्यासाठी गेला असता रिव्हर्स घेताना हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेनंतर काही जणांनी त्या मुलीला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलीला मृत घोषित केले. दरम्यान, संतप्त जमावाने यावेळी ट्रॅक्टरची तोडफोड केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामरगाव चौकीतील पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मुलीची सायकल व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस चौकी परिसरात लावण्यात आले. या घटनेचा अधिक तपास धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात कामरगाव चौकीतील पोलीस करीत आहेत.
परिस्थिती नियंत्रणात
या दुर्देवी घटनेमुळे संतप्त जमावाने ट्रॅक्टरची तोडफोड केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.