विद्यार्थी संख्या वाढली; ‘केव्हीके’ला इमारत पडतेय अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:46+5:302021-01-14T04:33:46+5:30
वाशिम : तीन वर्षांपूर्वी येथे मोठा गाजावाजा करून केंद्रीय विद्यालय सुरू झाले; मात्र जवाहर नवोदय होते, तीच इमारत ‘केव्हीके’ला ...
वाशिम : तीन वर्षांपूर्वी येथे मोठा गाजावाजा करून केंद्रीय विद्यालय सुरू झाले; मात्र जवाहर नवोदय होते, तीच इमारत ‘केव्हीके’ला देण्यात आली. आता विद्यार्थी संख्या वाढली असताना नव्या इमारतीचा प्रश्न अधांतरी असल्याने विद्यालयास जुनी इमारत अपुरी पडत आहे. नवीन इमारत उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून ३८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा पालकांना लागून आहे.
सन २०१८ मध्ये वाशिम शहरात केंद्रीय विद्यालय सुरू झाले. सुरुवातीला इयत्ता पाचवीपर्यंत आणि पुढील प्रत्येक वर्षी पुढची तुकडी सुरू करून प्राचार्य तथा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पुरेशा सुविधांसह लागणारी इमारत मात्र याठिकाणी अद्यापपर्यंत उभारण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाचे जवाहर नवोदय विद्यालय सुरू होते, त्याच इमारतीत केंद्रीय विद्यालय सुरू करून आपले हात झटकले. मध्यंतरी विद्यालयाकरिता लागणाऱ्या नव्या इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक न्याय भवनानजिक ३.६७ हेक्टर आर जमीन उपलब्ध करून दिली. त्याठिकाणी विद्यालय उभारण्यासाठी ३० करोड ६६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे शासनाला कळविण्यात आले आहे. सोबतच इमारत बांधकामाचे नकाशे तयार करून तथा जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या त्रुटी दूर करून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. असे असताना अद्यापपर्यंत निधीस मंजुरात मिळालेली नाही. एवढेच नव्हे तर ज्या एजन्सीने नकाशे तयार केले, त्या एजन्सीचेही पैसे अद्याप थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...........................
बॉक्स :
जुन्या इमारतीबाबत पालकांचा नाराजीचा सूर
वाशिममध्ये केंद्रीय विद्यालय सुरू होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. असे असताना विद्यालयासाठी लागणारी सुसज्ज इमारत उभारण्याकरिता आवश्यक असलेला निधी अद्याप मंजूर झालेला नाही. यामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित होत असून अतिरिक्त तुकडी किंवा वर्गखोल्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने एकाच वर्गात अधिक विद्यार्थी अशी गत झाली आहे. यामुळे पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
.............................
कोट :
केंद्रीय विद्यालयाची इमारत उभारण्याकरिता आवश्यक असलेली ३.६७ हेक्टर एवढी जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सेंट्रल पीडब्ल्यूकडे यासंबंधीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. शासनाकडून निधीला मंजुरी मिळताच इमारत उभारण्याचे काम सुरू केले जाईल.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम