शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी करणार वृक्ष लागवड!
By admin | Published: June 1, 2017 01:14 AM2017-06-01T01:14:44+5:302017-06-01T01:14:44+5:30
वन विभाग पुरविणार वृक्ष : जय्यत तयारी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या नव्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी अर्थात २६ जूनला सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्ष लावले जाणार आहेत. त्याचे जय्यत नियोजन केले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांनी सोमवारी दिली.
गेल्या काही वर्षांत झपाट्याने सुरू असलेली वृक्षतोड आटोक्यात आणण्यासाठी तद्वतच नव्याने वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सक्रीय पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, गतवर्षी १ जुलैला एकाच दिवशी राज्यभरात २ कोटी रुपयांपेक्षा अधिक वृक्षलागवड करण्यात आली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून येत्या १ जुलैपासून राज्यभरात वृक्षलागवडीचा उपक्रम पुन्हा राबविला जात आहे. राज्यशासनाच्या निर्देशानुसार, वाशिम जिल्हा प्रशासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत ५ लाख ८ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तत्पुर्वी वृक्षलागवडीचा हा उपक्रम संपूर्ण शाळांमध्ये पूर्ण ताकदीने राबविला जाणार आहे.
यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार असून तशा सुचना माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाध्यक्षांना दिल्या आहेत.