शैक्षणिक सत्र संपूनही मिळाल्या नाहीत विद्यार्थीनींना सायकल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:11 PM2019-05-16T17:11:02+5:302019-05-16T17:11:07+5:30
जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर आहे; मात्र शैक्षणिक सत्र संपले असताना एकाही विद्यार्थीनीस याअंतर्गत सायकल मिळालेली नाही.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर आहे; मात्र शैक्षणिक सत्र संपले असताना एकाही विद्यार्थीनीस याअंतर्गत सायकल मिळालेली नाही. प्रशासकीय उदासिनतेमुळे हा प्रकार घडला असून आता किमान आचारसंहिता संपेपर्यंत यासंदर्भातील कार्यवाही देखील होणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, काही उपक्रम, योजनांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत आहे. मानव विकास मिशनअंतर्गतची मोफत सायकल योजनाही प्रशासकीय दिरंगाईत अडकली आहे. जिल्ह्यात मानव विकास मिशनमध्ये समाविष्ट चार तालुक्यांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्यास असणाºया विद्याथीर्नीनींना सायकल घेवून देण्याकरिता जिल्हा नियोजन विभागाकडून माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे १४२६ सायकलींसाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी आचारसंहितेपुर्वीच वळता करण्यात आला; परंतु त्याचे पंचायत समिती स्तरावर वेळेत वाटप झाले नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने २०१८-१९ हे शैक्षणिक सत्र संपूनही मोफत सायकल वितरणाचा प्रश्न अद्यापपर्यंत लालफितशाहीत अडकून असल्याचे सूत्रांनी सांगितले.