दिव्यांगांनी स्वकमाईतून शिक्षण व उदरनिर्वाहासाठी केली हजारोंची कमाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:52 PM2018-09-04T14:52:38+5:302018-09-04T14:54:47+5:30
राख्यांची विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारोंची कमाई झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जन्मत: अंध असलेल्या काही दिव्यांगांनी एकत्र येवून रक्षाबंधनासाठी लागणाºया राख्या तयार केल्यात. या राख्यांची विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारोंची कमाई झाली. यामधून दिव्यांगांना शिक्षण व उदरनिर्वाहासाठी मोलाचे अर्थसहाय्य मिळाले.
वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर येथे जिल्ह्यासह परजिल्हयातील निराधार असे १० ते ११ दिव्यांगांना समाजसेवक पांडुरंग उचितकर यांनी एकत्र आणले. पांडुरंग यांचा चेतन नामक मुलगा जन्मत:च अंध असल्याने दिव्यांगांच्या दु:खाबाबत त्यांना चांगलेच अवगत आहे . जिल्ह्यात अशा दिव्यांगांना एकत्र करुन चांगले शिक्षणासह जीवन जगण्याचे धडे दिले. त्यातूनच त्यांनी एक आर्केस्टा तयार करून त्यामध्ये फिल्मी गीतांऐवजी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. या दिव्यांगाचा हा आर्केस्टा महाराष्ट्रासह गोव्यात नावारुपास आलेला आहे. याव्दारे ते बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्त्या, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान यासह विविध सामाजिक उपक्रमांची जनजागृती करतात. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनानिमित्त त्यांनी राख्या तयार करून शहरातील गजानन महाराज संस्थान व ईतर ठिकाणी स्टॉल उभारले. तेथे एक फलक लावले व त्यावर दिव्यांगाचे जीवन कसे अंधकारमय आहे, त्यांना जीवन जगतांना उद्भवत असलेल्या समस्यांबाबत मार्मिक व हदयस्पर्शी मजकूर लिहिला. खालील दोन ओवीमध्ये आमच्या उदरनिर्वाह व शिक्षणासाठी कोणतीही राखी दोन रुपयात घ्या व आम्हा दिव्यांगांना सहकार्य करा असे नमूद केले. शहरामध्ये विविध रंगबेरंगी, आकर्षक राख्यांचे लागलेल्या दुकानापेक्षा दिव्यांगांच्या या स्टॉलवर गर्दी दिसून आली. यामधून त्यांना चांगली कमाई झाल्याचे या दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणाºया पांडुरंग उचितकर यांनी सांगितले.