विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा!
By संतोष वानखडे | Published: August 2, 2023 03:08 PM2023-08-02T15:08:04+5:302023-08-02T15:08:50+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवून, आम्हालाही वर्ग खोली द्या हो मॅडम, अशी आर्त हाक दिली.
संतोष वानखडे, वाशिम : डव्हा (ता.मालेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ ऑगस्ट रोजी पालकांनी आपल्या पाल्यांची शाळा जिल्हाधिकारी कार्यालयात भरविली.
जिल्हा परिषद शाळेच्या तुलनेत खासगी शाळांचा भौतिक व शैक्षणिक दर्जा अधिक सरस असल्याची भावना पालकांमध्ये दृढ होत चालली आहे. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्याच नसल्याने गावातील संस्थानमध्ये शाळा भरते. नवीन वर्गखोल्यांची मागणी वारंवार करूनही याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याचे पाहून यापूर्वी पालकांनी २४ जुलै रोजी आक्रमक पाल्यासह जिल्हा परिषदेत ठिय्या दिला होता. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्यापही ठोस कार्यवाही नसल्याने २ ऑगस्ट रोजी शिवसेना (शिंदे ) जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवून, आम्हालाही वर्ग खोली द्या हो मॅडम, अशी आर्त हाक दिली.