वर्गात जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जावे लागते चिखल तुडवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:24 PM2018-07-18T13:24:16+5:302018-07-18T13:26:47+5:30
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. याबाबत मात्र कोणालाही काही देणे घेणे दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांनी बिरबलनाथ स्पोर्ट क्लबच्या अध्यक्षांना व सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार क्लबच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी आक्रमक होत थेट गटविकास अधिकाºयांचे कार्यालय गाठुन त्यांना सदर प्रश्न निकाली काढण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
मंगरुळपीर शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या बाजुला जि.प.कनिष्ठ महाविद्यालय आहे. तेथील विद्यार्थ्यांनी बिरबलनाथ स्पोर्ट क्लबच्या सदस्यांना शाळेतील अडचणीची माहिती दिली. यावेळी सदस्यांनी शाळेत जावुन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता तेथे प्रचंड दुरावस्था आढळली. विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्या मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावे लागते. वाढलेल्या गवतामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. बसण्याचे बाक तुटलेल्या अवस्थेत आहेत. संपूर्ण खोल्यामध्ये घाण व कचरा साचलेला असुन दोर खिडक्यांची तावदाणे तुटली आहे. छत गळत आहेत. तसेच येथे नुकतीच टायपिंगची परिक्षा झाली होती.त्याचा कचरा सुध्दा साफ केलेला नाही . मुलीकरिता स्वच्छतागृह नाही, त्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या इमारतीच्या आवारातच बाहेरील व्यक्ती शौचास बसतात, त्यामुळे सर्वीकडे दुर्गंध येत आहे. वर्ग ११ व १२ वी करिता एकच शिक्षीका असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत बसावे लागते. जिवशास्त्र, भौतीक शास्त्र, गणीत या विषयांकरिता शिक्षक नाहीत. म्हणुन विद्यार्थ्यांच्या या समस्या ताबडतोब सोडुन त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवुन द्यावा असे बिरबलनाथ क्लबचे अध्यक्ष सुनिल मालपाणी व सदस्यांनी येथील गटविकास अधिकारी खैरे, गटशिक्षणाधिकारी कौसल व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे. तसेच चोवीस तासाच्या आत विद्यार्थ्यांची समस्या मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाने दुर केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बिरबलनाथ स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष सुनिल मालपाणी व सर्व सदस्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिला आहे.