मंगरुळपीर येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी राहिले दोन दिवस उपाशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 07:07 PM2017-12-10T19:07:14+5:302017-12-10T19:11:26+5:30
मंगरुळपीर : प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील अनुसूचित जाती, जमाती मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी राहावे लागल्याचा प्रकार घडला. वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर समाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिकारी मुसळे आणि गृहपाल सोनटक्के यांनी वसतीगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

मंगरुळपीर शहरालगतच अंबापूर येथे समाज कल्याण विभागांतर्गत अनुसुचित जाती, जमातीच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्यात आले आहे. या वसतीगृहात ग्रामीण विभागातील जवळपास दोनशे विद्यार्थी आहेत. या वसतीगृृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या आहारासह शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणे आवश्यक आहे; परंतु परिस्थिती अगदी त्या विरुद्ध असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणसुद्धा अनियमितपणे दिले जात आहे. त्याशिवाय दोन वर्षांपासून शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरीचा खर्चही मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी मंगरुळपीर-वाशिमचे आमदार लखन मलिक आणि नगरसेवक अनिल गावंडे यांनी या वसतीगृहाला भेट दिली असता त्यांच्या लक्षातही हा प्रकार आला होता. त्यांनी याबाबत अधिकाºयांना सूचित करून दखल घेण्यास सांगितले होते. आता अवघे १५ दिवस उलटत नाही तोच येथील विद्यार्थ्यांना मागील दोन दिवसांपासून उपाशीपोटी राहावे लागले. या प्रकारामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर सामाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिकारी मुसळे आणि गृहपाल सोनटक्के यांनी शनिवारी या वसतीगृहाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. अंबापूरच्या वसतीगृहाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता अमरावती येथील समाज कल्याण आयुक्तांनीच दखल घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, दोन दिवस उपाशी राहिलेल्या विद्यार्थ्यांना भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी खिचडीचे वाटप केले.