विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 07:45 PM2017-10-12T19:45:43+5:302017-10-12T19:46:13+5:30
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. या स्पर्धेत शिवणी दलेलपूर शाळेच्या संघाने विजय मिळविला. दरम्यान, स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली.
केंद्र प्रमुख आर.एच. खंदारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन १० आॅक्टोबर रोजी झाले होते. आसेगाव केंद्रातील १५ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. १० आॅक्टोबर रोजी प्राथमिक शाळा स्तरावरील कबड्डी, लंगडी या सांघिक स्पर्धा तर धावणे, लांब उड्डी, टप्पा शर्यत या वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ११ आॅक्टोबर रोजी उच्च प्राथमिक शाळा स्तरावरील लंगडी, कबड्डी, खो-खो आदी सांघिक खेळ तर धावणे, लांब उडी, टप्पा शर्यत, गोळा फेक आदी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. आसेगाव केंद्रांतर्गत दस्तापूर, चिंचखेड, मथुरा तांडा, रामगड, कुंभी, लही, वसंतवाडी, भडकुंभा, दाभडी, पिंपळगाव, शिवनी, नांदगाव या १३ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा तसेच आसेगाव जिल्हा परिषद मराठी व उर्दू प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. शिवणी दलेलपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी खो-खो व कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख आर.एच. खंडारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक जी.एस. शिनगारे, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जावेद यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
दरम्यान स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यामुळे प्रदुषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदुषण रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.