चार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली रेखाकला परीक्षा!
By संतोष वानखडे | Published: October 4, 2023 03:52 PM2023-10-04T15:52:19+5:302023-10-04T15:52:42+5:30
यंदा ४ ऑक्टोबरपासून वाशिम शहरात एलिमेंटरी परीक्षेला सुरूवात झाली तर ५ ऑक्टोबरपासून इन्टरमिजिएट परीक्षेला सुरूवात होणार आहे.
वाशिम : राज्याच्या कला संचालनालयातर्फे ४ ऑक्टोबरपासून शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेला सुरूवात झाली असून, वाशिम शहरातील चार केंद्रांवर दीड हजारावर विद्यार्थ्यांनी रेखाकला परीक्षा दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्याच्या कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इन्टरमिजिएट) दरवर्षी घेतली जाते. चित्रकला परीक्षेतील गुण हे २०१७ पासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत समाविष्ठ केले जात असल्याने चित्रकला परीक्षेतील विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ वाढत आहे.
यंदा ४ ऑक्टोबरपासून वाशिम शहरात एलिमेंटरी परीक्षेला सुरूवात झाली तर ५ ऑक्टोबरपासून इन्टरमिजिएट परीक्षेला सुरूवात होणार आहे. एलिमेंटरी परीक्षेसाठी मुख्य परीक्षा केंद्र न.प. महात्मा गांधी विद्यालय वाशिम असून या परीक्षा केंद्रावर ४०९ विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. याशिवाय वाशिम शहरातील श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय, वत्सगुल्म मराठी प्राथमिक शाळा व रेखाताई राष्ट्रीय विद्यालय असे तीन उपकेंद्र आहेत. या तिन्ही उपकेंद्रांवर एकूण ११०७ विद्यार्थी संख्या आहे.
आजपासून इंटरमिजीएट परीक्षा
५ ऑक्टोबरपासून इंटरमिजीएट परीक्षा वाशिम शहरातील तीन परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. न.प. महात्मा गांधी विद्यालय वाशिम हे मुख्य परीक्षा केंद्र असून येथे एकूण ३५२ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. दोन उपकेंद्र असून, श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय येथे २८७ तर वत्सगुल्म मराठी प्राथमिक शाळा वाशिम येथे ३१८ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली.