विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 12:00 PM2021-07-06T12:00:31+5:302021-07-06T12:00:37+5:30
Washim News : १ लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला १८ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. तथापि, आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील १ लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत.
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.
साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
अध्ययन, अध्यापन कसे करणार
यंदाच्या शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली असली तरी शाळांत शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने धडे देण्याच्या सूचना आहेत. तथापि, विद्यार्थ्यांकडे अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने शिक्षक अध्यापन करणार कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी गतवर्षीच्या पुस्तकांचा आधार विद्यार्थ्यांना शोधून अभ्यासासाठी वापरता येणार आहे; परंतु यासाठी जावे कोणाकडे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे; परंतु अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन त्यांचे वितरण कसे करायचे, याबाबत नियोजन केले जाणार आहे.
- गजाननराव डाबेराव,
प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम