बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:10 PM2018-06-27T14:10:11+5:302018-06-27T14:14:17+5:30
विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या व जिल्हा मुख्यालय क्षेत्राबाहेरील वास्तव्य असलेल्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक, त्याने ज्या राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. ही योजना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणाºया विद्यार्थ्यांना लागू राहिल. तथापि, विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजेच वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ठिकाणी प्रवेश घेतल्यास तो विद्यार्थी वाशिम नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी नसावा. विद्यार्थी ११ वी, १२ वी व १२ वी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असावा. ११ वी मध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यास १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षणाकरिता १२ वी मध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. १२ वी नंतर पदवी, पदविका तसेच पदवी नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. या अटी पूर्ण करणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे संपूर्ण कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले.