विद्यार्थ्यांना उद्या मिळणार जंतनाशक गोळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 07:31 PM2017-08-27T19:31:17+5:302017-08-27T19:33:00+5:30
१ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आतड्याचा कृमीदोष होऊ नये या दृष्टिकोनातून २८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आतड्याचा कृमीदोष होऊ नये या दृष्टिकोनातून २८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावाने कृमीदोष उद्भवू शकतो. मातीतून प्रसारित होणा-या जंतांमुळे १ ते १४ वर्ष वयोगटातील ६८ टक्के बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. बालकांमध्ये आढळणारा कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. आतड्याच्या कृमीदोषाचे मूळ हे जंतांमध्ये असून, या जंतांचा नाश करण्यासाठी जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनी अर्थात १८ आॅगस्ट रोजी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहिम राबविण्यात आली. या दिवशी ज्या बालकांना जंतनाशक गोळी मिळाली नाही, जे बालक गैरहजर होते, त्यांना २३ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी द्यावी लागणार होती. परंतू, शासनाने यामध्ये बदल केला असून, सुधारित धोरणानुसार आता २८ आॅगस्ट रोजी एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात ८३६ शासकीय, २७३ शासकीय अनुदानित व ३२ खाजगी अनुदानित अशा एकूण ११४१ शाळा, तसेच १०६४ अंगणवाडी केंद्रांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास २ लाख मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप केले. दुसºया टप्प्यात २८ आॅगस्ट रोजी उर्वरीत ९२ हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.