१.२९ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:21 PM2020-06-10T12:21:38+5:302020-06-10T12:21:44+5:30
१.२९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून, ७.०३ लाख पैकी आतापर्यंत ५.९१ लाख पाठयपुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली.
वाशिम : शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या शिक्षण घेणाऱ्या जिल्हयातील १.२९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून, ७.०३ लाख पैकी आतापर्यंत ५.९१ लाख पाठयपुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली.
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ३ हजार ११२ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. यामध्ये कारंजा तालुक्यातील १९ हजार ४४४ विद्यार्थ्यांना एक लाख ९ हजार ६९१ पाठ्यपुस्तके, मालेगाव तालुक्यात २० हजार ५९९ विद्यार्थ्यांना एक लाख १५ हजार ८७५ पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यात १७ हजार ३४७ विद्यार्थ्यांना एक लाख ४९० पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यात १६ हजार ५३३ विद्यार्थ्यांना ९२ हजार ३०९ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यात २६ हजार १०३ विद्यार्थ्यांना एक लाख १७ हजार ५३३ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यात २९ हजार १७ विद्यार्थ्यांना एक लाख ६७ हजार २१४ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. ९ जून पर्यंत जिल्ह्याला ५ लाख ९१ हजार ३८७ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली. सदर पाठ्यपुस्तके ही संबंधित पंचायत समितीच्या ाटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरून ही पाठ्यपुस्तके पंचायत समिती स्तरावर पाठविण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. शाळा नेमक्या कधी सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. तथापि, ऐनवेळी पाठ्यपुस्तकासंदर्भात धांदल उडू नये म्हणून मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवून आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ३८७ पाठ्यपुस्तके प्राप्त करून घेण्यात आली.