उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणाचा अहवाल गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:38+5:302021-01-08T06:11:38+5:30
वाशिम : कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणातील कथित अनियमिततेप्रकरणी लोकमतने १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून ...
वाशिम : कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणातील कथित अनियमिततेप्रकरणी लोकमतने १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने २६ नोव्हेंबर रोजी चौकशी केली; परंतु आता दीड महिना उलटत आला तरी या समितीने आपला अहवालच सादर केला नाही.
जिल्ह्यातील कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयांतर्गत गतवर्षी डायग्नोस्टिक मटेरियल, सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचर खरेदी, रेफ्रिजेटर, इन्व्हर्टर, बॅटरी, डेझर्ट कुलर, बाययोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट साहित्य, फ्लेक्स, औषधी, स्टेशनरी, रिफ्रेशमेंट, कापड खरेदीसह जनरेटर दुरुस्ती, वीज दुरुस्ती, सोनोग्राफी देयक, आहार सेवा, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती असे विविध आर्थिक व्यवहार पार पडले आहेत. हे सर्व साहित्य खरेदी करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि त्यापैकी काही साहित्याचा आदेशापूर्वीच पुरवठा होऊन याची देयकेही अदा करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले होते. लोकमतने १८ नोव्हेंबर रोजी ‘उपजिल्हा रुग्णालयात साहित्य खरेदीत अनियमितता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली. या समितीने २७ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन कागदपत्रांची तपासणी करीत चौकशी पूर्ण केली. तथापि, दीड महिना उलटत आला तरी समितीने आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
--------------------
त्या वैद्यकीय अधीक्षकांच्या जबाबाची प्रतीक्षा
कारंजा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत कथित साहित्य खरेदीत नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने चौकशी करून आपला अहवाल तयार केला आहे. आता त्या वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला. त्यांचा जबाब चौकशी समितीला नोंदवून त्या जबाबासह आपला अहवाल संबंधित स्तरावर सादर करावयाचा आहे. तथापि, त्या वैद्यकीय अधीक्षकांना या संदर्भात सूचना देऊनही ते अद्याप जबाब नोंदविण्यास उपस्थित झाले नसल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षांकडून मिळाली आहे.
---------------------
कोट: उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणातील कथित अनियमितता प्रकरणाची चौकशी करून अहवालही तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सादर करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय अधीक्षकांचा जबाब नोंदवून तो अहवालासोबत जोडावा लागणार आहे. तथापि, संबंधित वैद्यकीय अधीक्षक अद्याप जबाब नोंदविण्यास उपस्थित झाले नाहीत. गुरुवार ७ जानेवारी रोजी जबाब नोंदविण्यास उपस्थित राहण्याबाबत त्यांना स्मरणपत्रही दिले.
- एन.पी. नांदे,
प्रशासकीय अधिकारी, तथा अध्यक्ष
चौकशी समिती