पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:28+5:302021-07-29T04:40:28+5:30
वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण ...
वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील पंचनाम्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांच्यासह संबंधित अधिकारी व विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मंगरूळपीर व मानोरा तालुक्यामधील जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक क्षेत्रावरील पिकाचे अचूक पंचनामे होतील, तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी यामधून सुटू नये, याची दक्षता घ्यावी. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरुपात नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. त्यानुसार तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त पूर्व सूचनांचे अर्ज विहित कालावधीमध्ये विमा कंपनीकडे सुपूर्द करावेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. पीक नुकसानाच्या अनुषंगाने मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात सद्यस्थितीत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच पंचनाम्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या.
०००००
विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीने प्रत्येक तालुक्यासाठी प्रतिनिधी नेमले आहेत. या सर्व तालुकास्तरीय प्रतिनिधींनी कार्यालयीन वेळेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून कामकाज करावे. पीक विम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.
०००००००
७२ तासांत पूर्वकल्पना द्यावी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ऑनलाईन स्वरुपात, टोल फ्री क्रमांकावर नुकसानाची पूर्वकल्पना ७२ तासांत विमा कंपनीला देण्याविषयी कळविण्यात आले आहे. तसेच यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात सुद्धा ऑफलाईन स्वरुपात नुकसानाची पूर्वकल्पना देता येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार या कार्यालयांकडे प्राप्त झालेले शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीकडे सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.