बचत गटातील यशस्वी महिलांचा स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 04:04 PM2019-07-30T16:04:39+5:302019-07-30T16:04:48+5:30
यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप २०१८’ धोरणानुसार महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्र’ ही योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महिला बचत गटांना तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देवून उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एनआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन केलेल्या व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गटांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. तालुकास्तरावरील गटांना नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकास्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात येईल. ही संकल्पना उद्योगात रुपांतरीत करण्यासाठी तालुकास्तरावर मार्गदर्शन व सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल.
या संकल्पनेचे परीक्षण शासन निर्णयानुसार करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात येवून प्रत्येक तालुक्यातून १० नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल. तसेच जिल्हास्तरावर निवड करण्यात येणाºया १० बचत गटांना २ लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.