शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा; ९४ हजार रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:36 AM2021-05-05T11:36:01+5:302021-05-05T11:36:09+5:30
Positive News : बंडू राठोड यांनी तब्बल ९४ हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील कारपा येथील शेतकरी बंडू राठोड यांनी तब्बल ९४ हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.
तालुक्यातील कारखेडा येथील शेतकरी मोहन गुलाब जाधव यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेकडून ९४९६१ रुपये पीककर्ज मंजूर झाले. मोहन जाधव यांचे खाते क्रमांकाचा ९७४ असा शेवटचा क्रमांक आहे. परंतु शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकताना बँक प्रशासनाची चूक झाली व ते पैसे ८७४ या खात्यात २८ एप्रिल रोजी जमा झाले. ते खाते बंडू शंकर राठोड रा. कारपा या शेतकऱ्याचे आहे. आपल्या खात्यात एवढी रक्कम जमा कशी झाली, या विचारात ते होते तर दुसरीकडे मोहन जाधव हे पैसे जमा न झाल्याने बँकेचे उंबरठे झिजवत होते. खाते क्रमांक चुकल्याने तब्बल ९४ हजारपेक्षा जास्त रक्कम दुसरीकडे गेल्याने मोहन जाधव या शेतकऱ्याची चिंता वाढली.
ही रक्कम कारपा येथील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचे कळताच त्यांनी कारपा गाठून बंडू राठोड या शेतकऱ्याशी भेट होताच विनाअट मानोरा येथे विड्रॉल स्लीप भरून चुकीने खात्यात जमा झालेली रक्कम मानोरा येथे येऊन काढून दिली. शेतकरी बंडू राठोड यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी माजी जि प सदस्य सचिन रोकडे यांनी योग्य शिष्टाई केली.
(प्रतिनिधी)