उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:09 AM2021-06-26T11:09:40+5:302021-06-26T11:09:46+5:30
Summer vacation over; Students 'online' again : काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले; मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून यंदाही नवे शैक्षणिक सत्र शाळांमध्ये सुरू होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्या संपल्यानंतर काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत.
दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवले. त्यानंतर काहीच दिवसांत सर्वच ठिकाणच्या शाळा बंद करण्याचे फर्मान शासनस्तरावरून सुटले. यामुळे २०२०-२१ चे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन लाटानंतर आता तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: या लाटेत लहान मुले बाधीत होतील, असे संकेत आहेत. त्यामुळेच २०२१-२२ चे नवे शैक्षणिक सत्रही सुरू होण्याबाबत अद्यापपर्यंत शासनस्तरावरून कुठलीही ठोस हालचाल झालेली नाही.दुसरीकडे शासकीय शाळांप्रमाणेच खासगी शाळांनीही २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात ऑनलाइन शिक्षण कायम ठेवले. उन्हाळी सुटी संपल्यानंतर नव्या शैक्षणिक सत्रालाही ऑनलाइन पद्धतीनेच सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही खासगी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी ऑनलाइन क्लासेसमध्ये गुंतल्याचे दिसत आहे.
यंदाही वाजणार नाही शाळांची घंटा
जिल्ह्यात पहिली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या एकूण १३७८ शाळा आहेत. त्यातील खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे; मात्र जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत; मात्र दहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. इतर वर्गशिक्षकांसाठी हे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे.
मोफत पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे; मात्र अद्यापपर्यंत शासनस्तरावरून पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. ती कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना लागून आहे.
जिल्ह्यातील काही खासगी शाळांनी मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सुरू केले आहे. शासकीय शाळांकडून २८ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू केले जाणार असले तरी ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण दिले जाणार आहे. १० वी ते १२ वीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे; तर पहिली ते नववीपर्यंत ५० टक्के शिक्षक उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविलेली आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी, वाशिम