बोंडअळी नियंत्रणासाठी रोखला कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा; जिल्ह्यात २५ मेनंतर होणार उपलब्ध
By नंदकिशोर नारे | Published: May 16, 2024 05:03 PM2024-05-16T17:03:53+5:302024-05-16T17:05:23+5:30
मान्सूनपूर्व कपाशी पेरणीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
नंदकिशाेर नारे, वाशिम : मान्सूनपूर्व कपाशी पेरणीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यासह राज्यात कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा थांबवला आहे. प्रत्यक्ष २५ मेनंतर शेतकऱ्यांना हे बियाणे, उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला असतानाही इतर बियाण्यांचा पुरवठाही अल्प आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ५ हजार १८० हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन ३ लाख ७ हजार २७५ हेक्टर, तूर ६१ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ६०० हेक्टर, मूग २ हजार १०० हेक्टर, उडीद २ हजार ५०० हेक्टर, तर कपाशीच्या पेरणीचे ३० हजार ८२० हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. सर्व पिकांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मागील काही वर्षांत कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. प्रामुख्याने मान्सूनपूर्व पेरणी, तसेच फेब्रुवारीपर्यंत कपाशीची फरदड घेणे, या बाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतात, असे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळेच बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी मान्सूनपूर्व पेरणी थांबवणे, या उद्देशाने कपाशीचे बियाणे जिल्ह्यात उशिराने उपलब्ध करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यस्तरावरूनच हे नियोजन असून, साधारणत: २५ मेपासून शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे उपलब्ध होणार आहे.
१.५४ लाख बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी-
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३० हजार ८२० हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी कापूस बीटी बियाण्यांच्या १ लाख ५४ हजार १०० पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मे अखेरपर्यंत ही सर्व पाकिटे उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.