शेतकऱ्यांना अनुदानित कृषी औजारांचा पुरवठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:24 PM2018-05-08T14:24:51+5:302018-05-08T14:24:51+5:30
वाशिम : उन्नत शेती समृध्दी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जाणार आहे.
वाशिम : उन्नत शेती समृध्दी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अटी व शर्तीच्या अधिन राहुन २८ मे २०१८ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी मंगळवारी केले.
मजुरांची वानवा बघता राज्य शासनातर्फे कृषि यांत्रिकीकरणास चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, मोगडा (कल्टीव्हेटर) सर्व प्रकाराचे प्लांटर (खत व बियाणे टोकण यंत्र) मळणी यंत्र, पॉवर बिडर, रिपर व रिपर कम बाईंडर, दालमिल व पूरक यंत्र संच (डि-स्टोनर, पॉलिशिंग, ग्रेडींग, पॅकिंग इ.) ट्रॅक्टरचलीत फवारणी यंत्र (बूम स्प्रेअर) मिस्ट ब्लोअर, सबसॉइलर इत्यादी कृषि अवजारे घेण्याकरीता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. ट्रॅक्टरकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्प, अत्यल्प भूधारकशेतकरी व महिला लाभार्थींसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किंमतीच्या ३५ टक्के किंवा १.२५ लाख व इतर लाभार्थींसाठी किंमतीच्या २५ टक्के किंवा एक लाख तसेच इतर अवजारांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी, अल्प-अत्यल्प भू धारक शेतकरी व महिला लाभार्थींसाठी किंमतीच्या ५० टक्के व इतर लाभार्थींसाठी किंमतीच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणाकरीता विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थींची निवड करण्यात येईल. प्रत्येक अवजांरासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असून ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, अवजारास अनुदान दिले जाणार आहे.
पात्र शेतकऱ्यांना २८ मे पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्याला प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड तालुका हा घटक मानून सोडत पध्दतीने ८ जून २०१८ रोजी तालुकास्तरावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषिपर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी अथवा कृषि विभागाच्या संकेतस्थळावरुन याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले.