अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा आधार; जिल्ह्याला ५० कोटींचा बुस्टर
By दिनेश पठाडे | Published: October 4, 2023 03:25 PM2023-10-04T15:25:49+5:302023-10-04T15:26:14+5:30
६३ हजार ६२३ शेतकऱ्यांना मिळणार पीक नुकसानभरपाई
दिनेश पठाडे
वाशिम : राज्यात जून आणि जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. वाशिम जिल्ह्यातही जुलैच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. पुरामुळे जमिनीही खरडून गेल्या होत्या. बाधित शेतकऱ्यांचे लक्ष मदतीकडे लागले होते. अखेर राज्य शासनाने ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यात जिरायती, बागायती, फळ पिकांसह नदी, नाल्यांना पूर आल्याने शेतात गाळ साचून पिकांचे नुकसान झाले तसेच जमीन खरडून गेले होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने बाधित भागात पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. संयुक्त पंचनामे करुन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ५५ हजार २९७.६१ हेक्टरवरील क्षेत्रावरील पीक नुकसानासाठी ६० हजार १६५ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी १४ लाख ७ हजार १८५ रुपये मंजूर झाले तर १ हजार ९२९.०९ हेक्टरवरील शेतजमिनीच्या नुकसानापोटी ३ हजार ४५८ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासनाकडून लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. रब्बी हंगामापूर्वीच मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.