आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद
By admin | Published: July 4, 2017 02:20 AM2017-07-04T02:20:05+5:302017-07-04T02:20:05+5:30
जिल्ह्यातील वास्तव: जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांकडील आधार किट परत करण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली ५३ केंद्र महिनाभरापासून बंद आहेत. सदर पोर्टल बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांची आधार नोंदणी रखडली आहे. परिणामी, शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकांची एक ओळख असावी, या उद्देशाने आधार नोंदणी बंधनकारक केली. यासाठी केंद्र शासनाने सीएमएस कॉम्प्युटर लिमिटेड मुंबई या कंपनीला आधार नोंदणीचे काम दिले होते. यासाठी जिल्ह्यातील ५३ अधिकृत महा ईसेवा केंद्रांना आधार किट देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शासनाने दोन महिन्यांपूर्वी सीएमएस कंपनीचा सदर करार रद्द केला. या कंपनीबाबतच्या काही अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे पॅन नंबरला लिंक करण्यासाठी आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवी नोंदणी करणे, ही कामे थांबली. त्याशिवाय निराधारांना बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वितरित करण्यासाठी त्यांच्या बोटांचे ठसे अपडेट करणेही आवश्यक असून, हे कामही थांबले आहे. शासकीय योजना, शाळा प्रवेश असो वा इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधारकार्डची मागणी केल्या जाते. ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्याला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते, यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ५३ आधार केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून २०११ च्या जनगणनेनुसार आधार नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे; परंतु २०११ नंतरच्या लोकसंख्येचा विचार करता हजारो नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. शासनाच्या आवाहनानंतर अनेकांनी लहान बाळांचीदेखील आधार नोंदणी केली; परंतु माहितीचा अभाव व वेळोवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यातच जिल्ह्यातील आधार किटधारकांचे मानधन व अनामत रक्कम खोळंबली असून, शासनाने सीएमएस कंपनीचा करार रद्द केल्यानंतर सदर पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची रखडलेली आधार नोंदणी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे. याची दखल घेण्याची मागणी आधारकार्डपासून वंचित असलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शासनाने सीएमएस कंपनीकडून आधार नोंदणीचे काम काढून घेतले असून, हे काम महाआॅनलाइनमार्फत करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सीएमएसचे काम बंद केले आहे. आता जिल्ह्यात आधारअभावी निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी ईआयटीबाबत बोलणे केले असून, येत्या आठवडाभरात ही समस्या निकाली लागणार आहे.
-शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम