‘त्या’ रूग्णाची झाली शस्त्रक्रिया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:08 PM2017-09-11T19:08:17+5:302017-09-11T19:08:59+5:30
पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ५ सप्टेंबर रोजी समोर आणताच, रुग्णालय प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने उपाययोजना केल्या. वारंवार ‘तारीख पे तारीख’ मिळत असलेल्या ‘त्या’ रूग्णाची शस्त्रक्रियादेखील ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संतोष वानखडे / वाशिम : पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ५ सप्टेंबर रोजी समोर आणताच, रुग्णालय प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने उपाययोजना केल्या. वारंवार ‘तारीख पे तारीख’ मिळत असलेल्या ‘त्या’ रूग्णाची शस्त्रक्रियादेखील ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना मोफत स्वरूपात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. १०० खाटांवरून या दवाखान्यात २०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वाणवा असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एम.एस. (सर्जन) म्हणून डॉ. बडे हे एकमेव डॉक्टर सेवा देत आहेत. याच डॉक्टरांकडे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाची जबाबदारी आहे. यामुळे रूग्णांना तारीख पे तारीख मिळत असे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी रूग्णांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिने तातडीने पावले उचलली. डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसारच रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलाविण्याचे नियोजन केले. यापूर्वी ‘तारीख पे तारीख’ मिळणाºया ‘त्या’ रूग्णालादेखील नियोजित असलेल्या ११ सप्टेंबरला न बोलाविता अगोदरच बोलावून ७ सप्टेंबरला यशस्वी शस्त्रक्रिया केली.