शिरपूर येथे गारपीट नुकसानीचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:13+5:302021-03-22T04:37:13+5:30
अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, ...
अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, दुधाळा, घाटा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे विशेषत: कांदा बिजवाई, फळबाग, कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेडनेटसुद्धा उद्ध्वस्त झाले. नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले. याविषयी शनिवारी आ. अमित झनक यांनी तत्काळ जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व तहसीलदार रवी काळे यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार व कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर तहसीलदार काळे यांनी नुकसानग्रस्त भागातील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी शिरपूर येथील भाग नंबर १ चे तलाठी एन. व्ही. आंबुलकर व भाग नंबर ३ चे तलाठी जे. एन. साठे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तर भाग नंबर २ चे तलाठी पी.एस. अंभोरे यांनी मात्र रविवारी सुटी घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सचिन सारडा यांनी केली आहे. तसेच जुलै २०२० मध्ये शिरपूर येथील फरशी नाल्याला दोन वेळा पूर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सर्वेक्षण करूनही अद्यापही मदत मिळाली नाही. त्या नुकसानीची मदतसुद्धा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. एरवीही मालेगाव, रिसोड तालुक्यात क्वचितच दौरा करणारे स्थानिक खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.