जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा संशयित रुग्ण!
By सुनील काकडे | Published: July 13, 2024 05:23 PM2024-07-13T17:23:10+5:302024-07-13T17:23:45+5:30
आरोग्य विभाग ‘अलर्ट’ : विशेष पथक गावात डेरेदाखल
सुनील काकडे, वाशिम : तालुक्यातील देपूळ येथे झिका व्हायरसचा एक संशयित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. यामुळे आरोग्य विभाग ‘अलर्ट मोड’वर असून २५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक गावात डेरेदाखल झाले आहे. या पथकाने बारकाईने सर्वेक्षण करून नागरिकांना सुरक्षेसबंधी मार्गदर्शन केले.
प्राप्त माहितीनुसार, देपुळ येथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेस काही दिवसांपूर्वी ताप आला. सांधे देखील दुखायला लागले. त्यामुळे ती उपचारासाठी वाशिम येथील खासगी डाॅक्टर अतुल काळुशे यांच्याकडे गेली. काही ठराविक तपासण्या केल्या असता तिच्यात विशिष्ट लक्षणे आढळून आली. ती ‘झिका व्हायरस’ची असू शकतात, असे डाॅ. काळूशे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेत देपूळातील संबंधित महिला रुग्णाची भेट घेतली. तसेच रक्ताचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे पाठविले. पथकामध्ये पार्डी टकमोर आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कालवे, विस्तार अधिकारी (आरोग्य) विठ्ठल ठाकरे, संजय गंगावणे, पाणी पुरवठा कर्मचारी रामेश्वर गंगावणे, सुनिता अंभोरे. डी.एम. गंगावणे, राजू वाघ, डी.जी. ताजणे, सुनिल सरकटे, पुंडलिक देवळे, पांडुरंग नप्ते आदिंचा समावेश होता.
काय आहे झिका व्हायरस?
झिका विषाणू रोग किंवा झिका ताप हा मुख्यतः संक्रमित एडीस प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो. एखाद्या गर्भवती महिलेस संक्रमित डासाने चावा घेतल्यास झिका विषाणू प्लेसेंटामध्ये प्रवेश करू शकतो आणि गर्भावर देखील परिणाम करू शकतो. ‘झिका’चा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, परंतु गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका आहे. या आजारावर लस किंवा औषध उपलब्ध नाही.
झिका व्हायरसची लक्षणे
खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे
ताप, सर्दी, घाम येणे
स्नायू वेदना आणि डोकेदुखी
थकवा जाणवणे, भूक मंदावणे
देपूळ येथे जाऊन संबंधित रूग्णाची भेट घेतली. त्या रूग्णात आढळलेली लक्षणे ‘झिका व्हायरस’सारखी वाटत आहेत. त्यामुळे रक्ताचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या आजाराबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी घेणे गरजेचे आहे. - डाॅ. संगिता देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम