तांदळाच्या चोरट्या वाहतुकीचा संशय; पोलिसांनी पकडली मालवाहु बस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 06:40 PM2020-07-25T18:40:43+5:302020-07-25T18:40:57+5:30
मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : एसटी महामंडळाच्या मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली.
शेलुबाजार येथून कारंजा मार्गे तुमसर, भंडाराकडे जाणाºया महामंडळाच्या मालवाहू बसमध्ये सरकारी तांदूळ नेत नसल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतिष पाटील यांना मिळाली होती. सहाययक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह पोलीस चमूने नाकाबंदी करीत कोळी गावाजवळ शेलुबाजार मार्गे येत असताना एम.एच.१४ बी.टी.०८५६ क्रमांकाची बस थांबविण्यात आली. यावेळी पाहणी केली असता, या बसमध्ये वेगवेगळया कंपनीचे अंदाजे २०० प्लास्टीक बॅग दाभणाच्या व सुतळीच्या साहाय्याने शिवलेल्या असल्याचे आढळून आले. हा साठा संशयितरित्या असल्याने बस चालकाला विचारणा केली असता, हा गावंडे ट्रेडर्स शेलुबाजार येथून भरून गुरूदेव राईस मिल भंडारा, तुमसर येथे घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूदेव राईस मिल भंडारा येथील मालाची पावती दाखविण्यात आली. यावरून तुमसर, भंडारा येथून खरेदी केलेला माल हा शेलुबाजार येथे कसा पोहचला, असा प्रश्न पोलिसांनी तहसिलदार कारंजा यांना दिलेल्या पत्रात उपस्थित केला. हा तांदुळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे काय? याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा असे पत्र ठाणेदार पाटील यांनी कारंजा तहसिलदारांना दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तांदुळ नेमका कुणाचा ये स्पष्ट होईल.