स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतात साचलेल्या पाण्यात आंदाेलन
By नंदकिशोर नारे | Published: July 25, 2023 04:34 PM2023-07-25T16:34:21+5:302023-07-25T16:34:43+5:30
तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.
वाशिम : गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करत केली आहे. तात्काळ मदत जाहीर न केल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा इशाराही इंगोले यांनी दिला आहे.
दामुअण्णा इंगोले यांनी आज रिसोड तालुक्यातील कोयाळी, जांब केनवड या भागातील पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार नदीकाठच्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. तर शेकडो एक्कर वरील पीक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे ८४ कोटी रुपये जे जिल्ह्यातील काही गावाच्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही तेही तात्काळ द्यावेत अशी मागणी करण्यात आली.